"शब्दांच्या पलीकडचा आनंद: ऋग्वेदची मिठी आणि हेलिकॉप्टर"

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक खूप खास दिवस ठरला. दिवसभर अनेक कामं आटोपून, मनात ऋग्वेदला भेटायची अतिशय आतुरता होती. शिवनेरी बसने ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होतो, आणि प्रत्येक मिनिट ऋग्वेदला भेटण्यासाठी महत्त्वाचा वाटत होता. मी त्याला आधीच वचन दिलं होतं की, शाळा सुटेपर्यंत मी त्याला नक्की भेटेन. त्याने तो शब्द अगदी मनाशी घट्ट धरून ठेवला असेल, आणि मी उशीर केल्यास तो किती निराश होईल याची मला कल्पनाच नव्हती.

बापूंच्या कृपेने, बस ठाण्याच्या स्टँडवर बरोबर साडेचार वाजता पोहोचली. ऋग्वेदला शाळेतून पाच वाजता घ्यायचं होतं. काळजात हूरहूर लागली होती—कुठे उशीर तर होणार नाही ना? मी निकिताला कॉल केला, विचारलं की तिथे येऊन आमच्या गळाभेटीचा आणि आनंदाचा व्हिडिओ शूट करेल, पण तिच्या फोनला उत्तरच नव्हतं. आठ-दहा वेळा प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटी, ती इच्छा सोडून मी तडक रिक्षात बसलो.

रिक्षातही मन शांत नव्हतं. मला आधी वर्तक नगरच्या दुकानात जाऊन ऋग्वेदसाठी त्याचं आवडतं हेलिकॉप्टर घ्यायचं होतं. मागच्यावेळी त्याला तिथे एक लहान हेलिकॉप्टर खूप आवडलं होतं, पण तेव्हा मी त्याला घेऊन दिलं नव्हतं. आज मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायची खूप इच्छा होती.

दुकानात पोहोचल्यावर कळलं की ते हेलिकॉप्टर कालच विकलं गेलं होतं. एका क्षणात मनावर निराशेचं मळभ पसरलं. "आता काय?" असं वाटत असतानाच दुकानदाराने दुसरं हेलिकॉप्टर दाखवलं. ते पाहून मी त्याला थोडं कमी करून घेतलं आणि मनाला दिलासा मिळाला.

रिक्षा तशीच समता नगरच्या शाळेकडे निघाली. शाळेच्या गेटवर पोहोचून माझं हृदय धडधडत होतं—ऋग्वेदला भेटायचं क्षण जवळ येत होतं. शाळेतून ऋग्वेद बाहेर आला, बॅग आणि पॅन्ट सावरत, आणि मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला, त्याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. "पप्पा, तुम्ही आलात!" त्याच्या डोळ्यांतून बोलणारे हे शब्द माझ्या मनात कोरले गेले. तो धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत प्रेम, विश्वास आणि आनंदाचं धागं होता.

मी त्याच्याकडे पाहून हसलो, आणि त्याचं पहिलं प्रश्न, "माझं हेलिकॉप्टर कुठे आहे?" मी लगेच बॅगेची चैन उघडली आणि त्याचं हेलिकॉप्टर त्याच्या हातात दिलं. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने हेलिकॉप्टर उचललं आणि नाचायला सुरुवात केली, आणि मी ते पाहताच माझं हृदय आनंदाने भरून आलं.

तो क्षण, त्याची आनंदी चेहरा, आणि त्याची मिठी—हे सारे क्षण माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. त्या क्षणांनी मला सांगितलं की या जगातल्या सगळ्या यशापेक्षा आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद किती मोठा आहे.


Comments

Popular posts from this blog

भावनिक क्षण , मी आणि ऋग्वेद